ठाणे - ऑनलाइन जुळलेल्या लग्नाची अजब कथा समोर आली आहे. लग्न जुळविणाऱ्या वेबसाईटवर एकमेकांना पसंत केले. लग्नही ठरले. मात्र, लग्नाच्या तीन दिवसापूर्वीच तिला कळाले की, त्याचे लग्न आधीच झाले आहे. मात्र, दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतर जे काम पोलिसांना करायला हवे होते. ते तिने केले. अखेर तिला फसविणाऱ्याला विष्णूनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. विजय रामचंद्र जगदाळे, असे फसवणूक करणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे.
लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी फुटले होते ‘त्याचे’ बिंग , पोलिसांनी केले दुर्लक्ष
डोंबिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने दीड वर्षांपूर्वी लग्न जुळविणाऱ्या एका वेबसाईटवर लग्नासाठी आपली माहिती दिली होती. त्यांनतर काही दिवसात तिला नवी मुंबईत राहणाऱ्या विजय जगदाळेने मॅसेज केला. दोघांच्या घराच्यांनी बोलणीही करून त्यांचा साखरपूडा झाला. 26 मे 2019 रोजी लग्न ठरले होते. मात्र, लग्नाच्या तीन दिवसापूर्वी पीडित तरुणीला कळाले की, तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे आधीच लग्न झालेले आहे. लग्नाची सर्व तयारी झालेली असताना तिच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला. तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठून सर्व कैफियत मांडली. तसेच त्याच्या पहिल्या लग्नाचे फोटो दाखवत त्यावेळी तक्रार केली. तेव्हा विष्णूनगर पोलीस ठाण्यात कार्यतर असलेले तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र मुणगेकर यांनी सांगितले की, मंदिरात झालेल्या लग्नाचा पुरावा आमच्यासाठी ग्राह्य नाही. त्यांनतर पीडितेला माहिती मिळाली की, पहिल्या पत्नीसोबत आरोपी विजयची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली आहे. हा पुरावा घेऊन पुन्हा तरुणीने पोलीस ठाणे गाठले. मात्र, हा पुरावाही पोलिसांनी ग्राह्य धराला नाही. अखेर पीडित तरुणीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सहायक पोलीस आयुक्त जय मोरे यांच्या आदेशानंतर अखेर या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी तक्रार घेतली आणि आरोपी विजय जगदाळे याला दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतर अटक करण्यात आली आहे.
माझ्यासारखी फसवणूक इतर तरुणीची होऊ नये
विष्णूनगर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी वाय. जाधव म्हणाले, विजयला या प्रकरणात अटक केली आहे. त्याला 1 डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, पीडित तरुणीचे म्हणणे आहे की, विजयने मलाच नाही फसविले तर माझ्यासह अन्य महिलांचीही फसवणूक केली आहे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरुन अन्य कोणत्याही मुलीची फसवणूक होता कामा नये. विशेष म्हणजे पीडित तरुणीने ज्या प्रकारे आपल्यासोबत फसवणूकीचा पूरावा स्वत: गोळा करुन पोलिसांना दिला. जे काम पोलिसांना करायला हवे होते ते तिने केले. कल्याण न्यायालय व उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्याचा आरोपीने प्रयत्न केला होता. मात्र, त्याला जामीन मिळाला नाही. केवळ पीडित तरुणीच्या पाठपुराव्यामुळे विजय रविवारी गजाआड करण्यात आले आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! मांत्रिकाच्या सांगण्यावरून विवाहितेला बेदम मारहाण करीत घरातून काढले
हेही वाचा - ४ हजार ४१४ किलो जनावरांचे मांस भरलेला टेम्पो पकडला; नयानगर पोलिसांची कारवाई