नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुरुवात झाली तेव्हापासून, स्थानिक भूमिपुत्रांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक भूमिपुत्र करत होते. मात्र, सिडकोने या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे निश्चित केले आहे. हा भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणाऱ्या दि. बा. पाटील यांचा अपमान आहे, असे वक्तव्य मनसेचे सहचिटणीस बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
भूमिपुत्रांच्या हक्कासाठी दि. बा. पाटील यांनी केला होता संघर्ष -
काही दिवसांपूर्वीच सिडकोतर्फे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे निश्चित केले आहे. नवी मुंबई, रायगड, पनवेल व उरणमधील स्थानिक भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी दि. बा. पाटील यांनी आयुष्य पणाला लावले होते. त्यांच्याच कार्यक्षेत्रात होत असलेल्या विमानतळाला त्यांचे नाव देण्याची मागणी होत असताना अचानक सिडकोने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा केली. हा स्थानिकांचा व दि. बा. पाटलांचा अपमान आहे. बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर आहे मात्र, विमानतळाला पाटील यांचेच नाव द्यावे लागेल. अन्यथा स्थानिक भूमीपुत्रांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेश सहचिटणीस बाळासाहेब शिंदे यांनी दिला.