मुंबई/ठाणे - जगभरात गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नोकऱ्या गेल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशातच काही लोकांनी संधी साधत आपले व्यवसाय उभे केले आहेत. याच पैकी एक तरुण आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खरीड येथील सुनील पवार. या तरुणाने जंगलातील गुळवेल वनस्पती गोळा करून मोठमोठ्या कंपन्यांना देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्या माध्यमातून बड्या कंपन्यांनी त्याला एक कोटी 56 लाखांचे कंत्राट दिले आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून सुनिल पवारने शेकडो आदिवासी नागरिकांना सोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
आदिवासी तरुणाचा पुढाकार
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खरीड हा दुर्लक्षित भाग आहे. याच शहापूरच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जंगले आहेत. याच जंगलात मोठ्या संख्येने कातकरी हा आदिवासी समाज राहतो. देशाला स्वातंत्र मिळून आज 70 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी, हा समाज अद्यापही दुर्लक्षित राहिला आहे. सध्या हा समाजातील नागरिक विट भट्टीवर काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र, गेल्या एका वर्षापासून कोरोनाच्यामुळे या आदिवासींचा रोजगार हिरावला आहे. मात्र, याच आदिवासी समाजातील सुनील पवार या तरुणाने पुढाकार घेत जंगलातील गुळवेल वनस्पतीचे महत्व जाणून ती गोळा करण्याचा व्यवसाय दोन वर्षांपूर्वी सुरू केला होता. कोरोना दरम्यान रुग्णांची रोगप्रतीकार शक्ती कमी होत होती. ही रोगप्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी अनेक वनस्पतींचा वापर केला जातो. त्यापैकी एक गुळवेल वनस्पती गोळा करण्याचा व्यवसाय सुनील पवार करत होता. वर्षाला 3 ते 5 लाख रुपये मिळत होते.
1 कोटी 57 लाख रुपयांचे कंत्राट
सध्या कोरोनामुळे वनौषधींना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलती जीवनशैली, तणावाखालील जीवन, ‘फास्ट फूड’, दूषित वातावरण यामुळे अनेक रोग निर्माण झाले असून त्याच्या उपचारांवर औषधी वनस्पतीला विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांची रोगप्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदाचा वापर केला जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पतीची मागणी वाढली आहे. यांच्या फायदा सुनील पवार याला झाला आहे. दोन वर्षांपूर्वी वनवासी डोंगराळ भागातील अनुसूचित जमातींच्या कुटुंबांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी ‘शबरी वनवासी वित्त व विकास महामंडळ’ व ‘केंद्रीय जनजाती केंद्रीय मंत्रालय (ट्रायफेड)’ यांच्या मार्फत ‘पंतप्रधान वनधन योजना’ प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेचा फायदा घेत सुनील पवार या तरुणाने आदिवासी समाजातील कातकरी कुटूंबियांचा रोजगारासाठी शहापूर वनधन केंद्र सुरू केले होते. 300 कातकरी कुटूंबियांना जोडून गेल्या वर्षभरात 34 टन गुळवेल जमा केली होती. मात्र, यंदा कोरोनामुळे देशातील काही नामवंत कंपन्यांनी 350 टना पेक्षा जास्त गुळवेल वनस्पती पुरविण्याचे कंत्राट सुनील पवार यांनी दिला आहे. यांची किमींत 1 कोटी 57 लाख रुपये असून 15 जून, 2021 पर्यंत गुळवले कंपनीला पुरवठा करायचा आहे.
350 वनोउपज खरेदी व विक्री
सुनील पवार यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, माझ बालपण खरीड या कातकरी वाड्यावर गेले आहे. आईवडील वीटभट्टी व खडी फोडण्याचे काम करत आहे. पाड्यावरचे सर्वच लोक रोजगाराच्या शोधात शहरात स्थलांतर करत होते. हे वास्तव मी लहानपणापासून पाहत होतो. त्यामुळे मला या कातकरी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांना गावातच रोजगार मिळावा यासाठी शहापूर वन धन विकास केंद्र सुरु केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या शहापूर तालुक्यात शहापूर तालुक्यातील सहा ‘वनधन केंद्र’ सुरू आहेत. ज्यात शहापूर, मोखावणे, ढाकणे, वेहळोली, खरीड व अल्याणीचा समावेश आहे. सर्व केंद्रांना सरकारकडून अर्थसाहाय्य मिळाले आहे. सध्या विविध मोठ्या कंपन्यांना गुळवेल विक्री केली आहे. सुनील सांगतात, वनधन केंद्र व शबरी आदिवासी महामंडळाच्या सहकार्यामुळे गुळवेल पावडर व कच्च्या मालाची विक्री होत आहे.
काय आहे गुळवेल
गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. गुळवेल वनस्पती मागणी बाजरात मोठ्या प्रमाणात आहे. गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल असून तिचे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात. विषाणूजन्य ताप आणि मलेरियासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी या वनौषधीचा मोठा उपयोग होतो. त्याशिवाय रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी वापरली जाणारी एक सुप्रसिद्ध इम्युनो-मॉड्युलेटर औषधी वनस्पती म्हणून गुळवेलकडे बघितले जाते. त्याचबरोबर ताप, मधुमेह, मूत्रमार्गाच्या विकार, अशक्तपणा, कावीळ, दमा, ह्रदयाचा विकार इत्यादींच्या उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्याचा वापरला जातो. त्यामुळे यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहेत. यांच्या फायदा सुनील पवार यांच्या वनधन या केंद्राला झाला आहे.
हेही वाचा - जीवाची पर्वा न करता पोलिसांनी वाचवले आरोपी महिलेचे प्राण