ठाणे - वनविभागाने मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानकात एका तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाकडून 4 स्टार जातीचे कासव आणि तीन बाज, घार आणि घुबड अशा नऊ वन्यजीवांना ताब्यात घेतले. आरोपी मोहम्मद खलील रियाज अहमद उर्फ जायद खान (24) हा विविध प्रजातीचे पक्षी आणि कासवे घेऊन बंगळुरू येथून रेल्वेने मुंबईत आला होता. या तरुणाला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर त्या पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे.
रेल्वेने एकजण वन्यजीव व पक्षी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार, मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानकात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कोईम्बतूर-कुर्ला या रेल्वेच्या एस-1 या बोगीची तपासणी केली. त्यावेळी पुठ्ठयाच्या तीन बॉक्समध्ये विविध प्रजातीचे पक्षी आणि स्टार कासव आढळून आले. सदर पक्षी हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे अनुसूची 4 मधील संरक्षित वन्यपक्षी आहेत. यांची खरेदी/विक्री करणे, बाळगणे, पाळणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार बंदी आहे.
दरम्यान, कर्नाटक येथील मोहम्मद खान हा रेल्वेने हे वन्यजीव मुंबईत विक्रीसाठी आणताना सापडला. त्याने हे वन्यजीव बंगळुरू येथून खरेदी केल्याचे सांगत असून त्याचे काही साथीदारदेखील असण्याची शक्यता आहे. वनविभाग त्यांचाही शोध घेत असल्याची माहिती उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी दिली. दरम्यान, खान याला आज न्यायालयात हजर केले जाणार असून त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने या वन्यजीवांची नैसर्गिक अधिवासात सुरक्षित मुक्तता केली जाणार आहे.