ठाणे - ऑनलाईनच्या आधारे कपडे खरेदी करणाऱ्या एका तरुणाला तब्बल ९१ हजारांनी गंडवल्याची घटना कल्याणात उघडकीस आली आहे. लक्ष्मीकांत नंदनवार असे ऑनलाईन फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कल्याण पश्चिमेकडे उंबर्डे रोडला पर्ल बिल्डिंग आशा पूरा क्रावून सिटीमध्ये राहणारे लक्ष्मीकांत नंदनवार यांनी एका शॉपिंग साईटवर २० आक्टोबर रोजी ऑनलाईन ड्रेस बुक केला होता. त्यांनतर २४ ऑक्टोबरला त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीन फोन करत ब्ल्यू डार्ट कंपनी मधून बोलत असल्याचे सांगत पार्सल डिलिव्हरी करता इन्शुरन्सची रक्कम भरावी लागत असल्याचे सांगत लिंक पाठवली. या लिंकवर नंदनवर यानी बँकेचा नंबर टाकला असता त्यांच्या बँक खात्यातून ९१ हजार ९९६ रुपये ट्रान्सफर केले.
त्यांनतर मोबाईलमध्ये बँक खात्याचा मेसेज पाहताच त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी लक्ष्मीकांत नंदनवार यांनी अज्ञातांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्या भामट्याचा शोध सुरू केला आहे.