ठाणे - प्रवासाचे भाडे मागितले म्हणून एका रिक्षावाल्याचा गळा घोटून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रसाद खाडे उर्फ जगन्नाथ (वय २२, रा. जुनी डोंबिवली) असे जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी प्रवाशाचे नाव आहे.
लोकांनी सोडवल्याने अनर्थ टळला
रिक्षाचालक भाविक जेठवा (27) याने आरोपी प्रसाद खाडेला डोंबिवली पश्चिमेच्या मच्छी मार्केट समोरील रोडवर सोडले. नंतर भाविकने प्रसादला 20 रूपये भाडे मागतीले. त्यामुळे आरोपीला राग आला आणि रिक्षा चालकाला ठोसा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर, इथेच न थांबता प्रसादने भाविकचा गळाही आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे बोलले जात आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसरातल्या मच्छी मार्केट स्टँडवर घडली. यावेळी अन्य काही लोक धावत आल्याने पुढील अनर्थ टळला. लोकांनी भाविकला प्रसादच्या तावडीतून सोडवले.
रिक्षाचालकाच्या 6 बरगड्या फ्रॅक्चर
या मारहाणीत रिक्षावाला भाविकच्या 6 बरगड्या फ्रॅक्चर झाल्याचेही बोलले जात आहे. लोकांनी सोडवल्यानंतर रिक्षावाल्याने विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. जखमी भाविकच्या जबानीवरून हल्लेखोर प्रवासी प्रसाद खाडे उर्फ जगन्नाथ याच्याविरोधात पोलिसांनी भादंवि कलम 307, 323, 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - 'हॉटेल-बार व्यवसायिकांना करात सवलत द्या', पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
हेही वाचा - नितीन देसाईंच्या स्टुडिओला आग, जोधा अकबर किल्ल्याचा सेट जळाला