ठाणे - उल्हासनगर शहरातील सी ब्लॉक परिसरात मीनल अर्जुन चौहान विद्यालयातील बुथवर निवडणूक सेवेवर असलेल्या महापालिका कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. भगवान मगरे (५४) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघात आज निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी म्हारळ गावातील रिजेन्सी निर्माण येथील खुल्या मैदानात निवडणूक साहित्य आणि ईव्हीएमचे वाटप करण्यात आले. मगरे हे उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणूक कार्यरत आहेत. निवडणुकीसाठी त्यांची मिनल अर्जून चौहान विद्यालयातील बूथ क्रमांक ८७ वर सेवा लागली होती. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास मगरे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी निवडणूकीचे साहित्य घेऊन विद्यालयातील बूथ गाठला. जेवण झाल्यानंतर मगरे खुर्चीत बसले होते. मात्र, अचानक ते खाली कोसळले. बूथ प्रमुखांनी त्यांना तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले.
रविवारी उल्हासनगरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहचल्याने मगरे यांना उष्माघाताचा त्रास झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल असे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची माहिती उल्हासनगर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांना मिळताच त्यांनी मध्यवर्ती रुग्णालय गाठूत मृतकाच्या नातेवाईकांची विचारपूस केली. या प्रकरणी निवडणूक कर्मचाऱयांचा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला आहे.