ठाणे - मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एक हजार 900 हून अधिक नागरिकांवर ठाणे महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या नागरिकांकडून तब्बल 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही नौपाडा, माजिवडा-मानपाडा आणि त्यापाठोपाठ वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीत करण्यात आली आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी मस्कचा वापर न करता फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केलेल्या प्रभावी उपाय योजनांमुळे ठाण्यात कोरोना आटोक्यात येत असला तरी अजूनही काही नागरिकांकडून नियमांचे गांभीर्याने पालन होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. विशेष करून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करता काही नागरिक फिरत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेने गेल्या तीन आठवड्यापासून विशेष मोहीम राबवली आहे. यामध्ये सर्व प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांनी जातीने लक्ष घालून तसेच प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून अशा नागरिकांवर कारवाई केली.
ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीमध्ये गेल्या 21 दिवसांत 1 हजार 900 नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल केला आहे. विशेष करुन भाजी मंडई, बसस्थानक, रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसर अशा सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आहे. प्रत्येक नागरिकांकडून 500 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला आहे. मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनाही कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून त्यांच्याकडील दंडाची रक्कम मात्र समजू शकलेली नाही.
- प्रभाग समिती निहाय करण्यात आलेली कारवाई आणि दंड
प्रभाग समिती | कारवाई करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या | 500 रुपयांप्रमाणे आकारण्यात आलेला दंड |
नौपाडा | 387 | 1 लाख 93 हजार 500 |
वर्तक नगर | 265 | 1 लाख 32 हजार 500 |
माजिवडा-मानपाडा | 298 | 1 लाख 49 हजार |
उथळसर | 240 | 1 लाख 20 हजार |
कळवा | 187 | 93 हजार 500 |
मुंब्रा | 123 | 61 हजार 500 |
लोकमान्य-सावरकर नगर | 185 | 92 हजार 500 |
वागळे | 95 | 47 हजार 500 |
दिवा | 120 | 60 हजार |
एकूण | 1 हजार 900 | 9 लाख 50 हजार |
हेही वाचा - ठाणे : हॉटस्पॉट क्षेत्रातील लॉकडाऊन एक महिन्याने वाढले; जिम, शाळा सुरू करण्याची परवानगी