नवी मुंबई - नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून अमली पदार्थाविरोधात मोहिम सुरू असून या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी एकास नवी मुंबईतील वाशी गावातून ताब्यात घेतले. त्याच्या कडून तब्बल 89 किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने वाशी गावातील एका घरावर छापा टाकला असता तब्बल 10 लाख 76 हजार रुपये किंमतीच्या 89 किलो 250 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी मोहम्मद इम्रान सादिक अली शहा (वय 23 वर्षे, मुळ रा. लखनऊ, उ.प्र, सध्या शिवाजी नगर, गोवंडी) याला अटक करण्यात आली असून हा नवी मुंबईतील गांजाविक्रेत्यांना गांजा पुरवित असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.
परिमंडळ एक मधील अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने उलव भागात गांजाचा पुरवठा करणाऱ्याला अटक केली होती. त्यावेळी, वाशी गावातूनही एका व्यक्तीकडून नवी मुंबईतील गांजाविक्रेत्यांना गांजाचा पुरवठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाचे प्रमुख गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने वाशी गाव सेक्टर 31 मध्ये सापळा लावून मोहम्मद इम्रान सादिक अली शहा याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे १ किलो गांजा सापडला व विशेष पथकाने त्याला अटक केली. त्यानंतर विशेष पथकाने वाशी गावातील ओम साई निवास या इमारतीत भाड्याने घेतलेल्या आरोपी मोहम्मद इम्रान याच्या खोलीत 88 किलो 250 ग्रॅम गांजा आढळला. असा एकूण 89 किलो पोलिसांनी हस्तगत केला. मोहम्मद इम्रान हा मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून सध्या तो गोवंडी भागात राहतो. व्यवसायाने तो टेम्पो चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - नवी मुंबईतील भंगारातून प्लास्टिक बनविणाऱ्या कंपनीला बंदीची नोटीस