ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये असणाऱ्या अनेक रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. हे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. आज (28 एप्रिल) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील कौसा परिसरात आग लागल्याची घटना घडली. प्राइम क्रिटिकेयर नावाच्या या खासगी नॉन कोविड रूग्णालयात ही आग लागली. येथे एकूण 20 जण उपचार घेत होते. ज्यात 6 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तळमजल्यावरील मिटर बॉक्समध्ये आग लागल्यानंतर ही आग तेथील पुठ्ठ्याचे बॉक्स आणि इतर सामान जाळत पहिल्या मजल्यावरील आयसीयूपर्यंत पोहोचली. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतरीत करताना 4 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
आगीवर नियंत्रण, पण...
यास्मिन सय्यद (वय 46), नवाब शेख (वय 47), हलिमा सलमानी (वय 70) आणि हरीश सोनावणे (वय 57) अशी मृतांची नावे आहेत. आगीचे वृत्त कळताच मुंब्रा पोलीस, 5 रुग्णवाहिका, टोरेंट ऑफिशिअल्स, आरडीएमसी आणि फायर ब्रिगेड तीन फायर इंजिन, 2 वॉटर टँकर आणि एक रेस्क्यू व्हेइकल घटनास्थळी दाखल झाली. यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु इतरत्र हलविलेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले होते. 'ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली होती. या आगीची कारणं शोधण्यासाठी समिती नेमून चौकशी केली जाईल', असे आव्हाड यांनी म्हटले. तर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यानीही घटनास्थळी भेट दिली. 'ही दुर्दैवी घटना आहे. स्ट्रकचर, ऑडिट, ऑक्सिजन ऑडिट करायच्या सूचना मी नेहमी दिल्या आहेत. मृतांच्या नातेवाईंकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तर, जखमींना प्रत्येकी एक-एक लाख; तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ठाणे महापालिकेच्यावतीने देखील 5 लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यानी दिली आहे.
हेही वाचा - नागपुरात २५ वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, सहकारी डॉक्टरला बेड्या
हेही वाचा - सात एकरातील भुईमूग पिकात सोडली गुरे; पिकावर रोगांचा प्रादुर्भाव