ठाणे : समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीवरचे असलेले कळसूबाई शिखर अन्वी आणि आद्या या दोन मुलींनी सर केले आहे. कोणत्याही प्रकारची कुरकुर न करता अगदी सराईतपणे हे शिखर सर केल्याची माहिती भ्रमर ट्रेकींग संस्थेचे अध्यक्ष अनुप मालंडकर यांनी दिली. अन्वी आणि आद्याने आपले वडिल कैलास भांगरे व भूषण मोहिते यांच्याकडून वेळोवेळी घेतलेल्या ट्रेकिंग प्रशिक्षण आणि त्यामधील बारकाव्यांच्या अभ्यासामुळे हे शिखर सर करता आले. कळसूबाई राज्यातील गडकोट किल्यांमध्ये सर्वाधिक उंचीवर असल्याने महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा आनंद आम्हा भ्रमर ट्रेकींग संस्थेला झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
कोव्हीड काळात खंड पडला : कोव्हीड काळात खंड पडलेल्या भ्रमर ट्रेकींग संस्थेला ऊर्जा निर्माण करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष भूषण मोहिते आणि खजिनदार कैलास भांगरे यांच्या पुढाकाराने अन्वी आणि आद्याला कळसूबाई शिखर चढून जाण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार १३ जानेवारी २०२३ रोजी भंडारदरा जवळील बारी गावात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ जानेवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता आद्या आणि अन्वी या दोघींनी कळसूबाई पायरीला नमस्कारकरून या दोन चिमुकल्यांनी आपली नाजूक पावले पायरीवरून एकेक टाकून सर केल्याचे सांगितले. दरम्यान या दोन दिवसात त्यांनी जेवणाची कोणत्याही प्रकारे तक्रार न करता ग्रामीण जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला.
मोबाईलपासून दूर ठेवत इतिहासाची शिकवण : गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करणे, त्यांची भौगोलिक दृष्ट्या माहिती तरुण पीढीपर्यंत पोहचवणे, मोबाईलच्या स्क्रीनला आहारी पडलेल्या लहान-लहान मुलांना आपल्या इतिहासाबद्दल आकर्षित करणे हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे. मागील दोन वर्ष कोव्हीड काळात ट्रेकिंग होऊ शकली नाही. म्हणून सुरवातीला लहान मोठ्या टेकड्या चढण्याचा सराव गेली दोन वर्षे मुलांकडून करून घेतला जातो. विशेष म्हणजे कोव्हिड काळात जंक फूड पूर्णपणे बंद असल्याने घरगुती रूचकर आहार त्यांच्या अंगवळणी पडला. त्याच सकस आहारामुळे प्रतिकार शक्ती वाढीस लागली. या संचय केलेल्या प्रतिकारशक्तीचा उपयोग लहान मोठे गडकोट किल्ले चढण्यासाठी होत आहे, असे मालंडकर सांगतात.
शिखर सर केल्यानंतर दोघी गेल्या शाळेत : येवढे मोठे यश मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून या दोघींनी शाळा गाठली. येवढ्या कमी वयात येवढे अंतर चालून गेल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा थकवा दोघींमध्ये दिसला नाही. दोघींनी शाळेला दांडी न मारता दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. त्यामुळे दोघींच्या पालकांमध्ये आणखी हुरूप आला आहे. लवकरच आणखी एका ट्रेकसाठी तयारी सुरू असल्याचे पालक सांगत आहेत.
हेही वाचा : Parliament Budget Session : अदानी प्रकरणावरून विरोधक आक्रमक, लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब