ठाणे - भिवंडी तालुक्यातील मौजे टेंभवली गावात एका वीटभट्टी उद्योजकाच्या घरावर दरोडा पडला. या घटनेत दीड कोटी रुपये किमतीचे 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी चोरून नेली. दिपक परशुराम बाबरे असे घरफोडी झालेल्या वीटभट्टी उद्योजकाचे नाव आहे. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुलीला सासरी सोडण्यासाठी गेले होते बाबरे कुटुंब -
वीटभट्टी मालक दिपक बाबरे हे आपल्या कुटुंबासह मुलीला सासरी (पनवेल) येथे सोडण्यासाठी गेले होते. ते गुरुवारी सायंकाळी घरी परतले. गेटचे व घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात येऊन त्यांनी कपाटाची तपासणी केली असता, कपाटातील 3 किलो सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले.
या दरोड्याच्या घटनेची माहिती तत्काळ तालुका पोलीस ठाण्याला देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.