नवी मुंबई - नवी मुंबईत विक्रमी ३६१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कडक निर्बंधांसहित लॉकडाऊन लागू असतानाही सतत कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे नवी मुंबईतील २८४ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी आढळलेल्या ३६१ रुग्णांमुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा आता ८ हजार ८७९ पर्यंत पोहोचला आहे. ६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईतील काही ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट बनत चालले आहेत. या भागातूनच गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने आता नवी मुंबईमध्ये ३ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते १३ जुलै पर्यंत पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. नवी मुंबईमध्ये दिवसभरात आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ३५, नेरुळ ७५, वाशी २५, तुर्भे २७, कोपरखैरणे ४७, घणसोली ६२, ऐरोली ७१, दिघा १९ रुग्ण येथील रुग्णांचा समावेश आहे.
समाधानाची बाब म्हणजे शुक्रवारी एका दिवसात तब्बल २०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील बेलापूर ३०, नेरुळ ३७, वाशी ७, तुर्भे १३, कोपरखैरणे १८, घणसोली २०, ऐरोली ६०, दिघा १७ असे एकूण २०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५ हजार २८५ वर पोहोचली आहे. नवी मुंबईत सध्या ३ हजार ३१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.