नवी मुंबई - कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. आता एकाच दिवसात 22 रुग्ण नवी मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे, नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 96 असून यापैकी 11 रुग्ण हे अन्य ठिकाणी राहणारे आहेत. नवी मुंबई शहरातील 85 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
म्हापे एम.आय.डी.सीमध्ये एका बँकिंग सेवा कंपनीमधील 19 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यातील फक्त 8 कर्मचारी हे नवी मुंबईतील रहिवासी आहे. उर्वरित 7 मुंबई, 2 ठाणे, 1 सांगली तर 1 तेलंगणा येथील रहिवासी आहे. सद्यस्थितीत या 19 जणांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ते काम करत असलेल्या कंपनीत प्रवेशही प्रतिबंधित करण्यात आला आहे.
याशिवाय नवी मुंबईत राहणाऱ्या आणखी तिघांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोपर खैरणेच्या सेक्टर 19 मधील 19 वर्षीय व्यक्तीला व सेक्टर 7 मधील 28 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्ती राहत असलेल्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून संबंधित भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
तुर्भे येथील 27 वर्षीय महिलेचा कोरोना अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित महिला घरकाम करत होती. 23 मार्चपासून ही महिला घरीच होती. तिचे पती लेबर वर्क करतात. त्यांचेही स्वॅब महानगरपालिकेच्या माध्यमातून तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. महिला राहत असलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.