ठाणे - किरकोळ वादातून एका २५ वर्षीय तरुणावर भर रस्त्यातच गावगुंडांनी चॉपर आणि तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहेत. ही घटना भिवंडी शहरातील चरणी पाडा परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे हल्ल्याचा थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद करून तो व्हिडिओ व्हायरल केला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात हल्लेखोराविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. गेनू बांगारे, मनोज बांगारे, गोपी गिरी, अमित रायत असे अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. तर अमोल माने (वय २५) असे हल्ल्यात गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यातील चरणीपाडा भागात अमोल माने कुटुंबासह राहतो. रविवारी रात्रीच्या सुमारास अमोल भरधाव वेगाने आपले चारचाकी वाहन परिसरातून घेऊन जात असताना आरोपीचा समज झाला, की आमच्या जवळून भरधाव वेगाने कार घेऊन कसा जातो. याच गोष्टीचा राग मनात धरून या गाव गुंडाने अमोल माने याच्यावर भर रस्त्यात चॉपर, तलवारी व लोखंडी रॉडने अचानक जीवघेणा हल्ला केला. अमोलवर हल्ला केल्याचे पाहून अमोलचे वडील व त्यांचे भाऊ हे त्याला वाचविण्यासाठी आले होते. मात्र त्यांनाही या गावगुंडाने जखमी केले आहे. सध्या अमोलवर भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. नारपोली पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी हल्लेखोर विरोधात गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री उशीरा चार हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. आज (मंगळवार) चारही हल्लेखोरांना न्यायायलायत हजर केले असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.
हल्ल्याच्या थराराचा व्हिडिओ व्हायरल
या हल्ल्याच्या थराराचा व्हिडिओ परिसरातील इमारतीमधून एका नागरिकांनी मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाल यांच्याशी संपर्क साधला असता चार आरोपींना अटक केली असून या संपूर्ण प्रकरणात तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - VIDEO : शेतकऱ्याला जास्त भाव दिल्याने व्यापाऱ्यांची व्यापाऱ्याला मारहाण