नवी मुंबई - वाशीमधील महापालिका रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 20 वर्षीय तरुणीचा बळी गेल्याचा आरोप मृत मुलीच्या पालकांनी केला आहे. संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नवी मुंबईत तुर्भे येथे राहणाऱ्या बाळू कसबे यांच्या पूजा कसबे या 20 वर्षीय मुलीला श्वसनाचा त्रास होता. त्यामुळे तिला नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. मात्र, तेथे तिच्यावर उपचार न करता तिला नेरुळमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे रुग्णालयात पाठविण्यात आले. दम लागत असल्याने तिला वाशीमधील पालिकेच्या रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. तेथे तिला ऑक्सिजन लावण्यात आले व तिची कोविड टेस्ट करण्यात आली. तिची कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर वाशीमधील कोविड रुग्णालयातून स्थलांतरीत करण्यास मुलीच्या वडिलांना सांगण्यात आले.
नॉन कोविड रुग्णालय शोधण्यासाठी पूजाच्या वडिलांची वणवण सुरूच होती. दरम्यान, वाशी महापालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणीला त्याच रुग्णालयामध्ये दुसऱ्या मजल्यावर हलविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तिला दुसऱ्या मजल्यावरील वार्डमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान, पूजा हिला पुन्हा श्वसनाचा त्रास सुरू झाला. श्वास कोंडल्यामुळे तिला सतत तहान लागत होती. त्यावेळी तरुणीला ना पाणी देण्यात आले, ना ऑक्सिजन लावण्यात आले. ही बाब पूजाने तिच्या वडिलांना फोन करून सांगितली. त्यामुळे बाळू यांनी त्वरित मनपा रुग्णालय गाठले आणि माझ्या मुलीला निदान पाणी तरी द्या, असे सांगितले असता, आम्ही फक्त टेबलावर कामे करतो, असे उत्तर डॉक्टरांनी दिले.
हेही वाचा - मनसेने करून दिली मुख्यमंत्र्यांना टोलमुक्तीची आठवण; केला 'हा' व्हिडिओ पोस्ट
त्याच रात्री पूजाची तब्येत खालावली त्यामुळे तिला शिवडी येथील टी.बी रुग्णालयामध्ये हलवण्याच्या सूचना दिल्या. टीबी रुग्णालयामध्ये पूजाला नेले असता डॉक्टरांनी तिला टी.बी नसल्याचे सांगून तिला ऑक्सिजनची गरज आहे, असे सांगितले. तिला केईएम किंवा जे.जे रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. दरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा पूजाला नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार न झाल्याने हलगर्जीपणामुळे तिचा तीन दिवसात मृत्यू झाला.
माझ्या मुलीचा मृत्यू वाशी मनपा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी मुलीच्या पालकांनी केली आहे. याकरिता त्यांनी नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली असून त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - महात्मा गांधी जयंती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आदरांजली