ठाणे - उल्हासनगर गुन्हे शाखा व हिललाईन पोलिसांनी संयुक्तरित्या गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकल्याची घटना घडली. पोलिसांनी या छाप्यादरम्यान दोन हजार लिटर वॉश, ४०० लिटर गावठी दारू, ४० गुळाच्या गोण्या व नवसागर असा ९४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तर, दारूमाफिया राजेश चोळेकर (४३) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, अंधाराचा फायदा घेत त्याचे ३ सहकारी त्या ठिकाणाहून पसार झाले.
हेही वाचा -'जमिनीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा'
अंबरनाथ तालुक्यातील द्वारली पाडा येथे नाल्याच्या बाजूला दारू माफिया राजेश चोळेकर गावठी दारू बनविण्यासाठी हातभट्टी लावत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखा घटक- ४ चे व पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे, गणेश तोरगल, दयकुमार पालांडे, रमेश केंजळे, सुनील जाधव, नवनाथ वाघमारे, चंद्रकांत पाटील, नवनाथ कोरडे, योगेश पारधी व हिललाईन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, जितेंद्र चतुरे यांनी संयुक्तरित्या रात्रीच्या सुमारास द्वारलीपाडा परिसरात छाप टाकली. ज्या ठिकाणी गावठी दारूची हातभट्टी सुरू होती तिथे पोलिसांनी छापा टाकून राजेश चोळेकर याला ताब्यात घेतले. तर, अंधाराचा फायदा घेत त्याचे ३ सहकारी त्या ठिकाणाहून पसार झाले.
पोलिसांनी त्या ठिकाणाहून ४० हजार रुपये किंमतीचा २ हजार लिटर दारू बनवण्यासाठी लागणारा वॉश, २४ हजार रुपये किंमतीची ४०० लिटर गावठी हातभट्टीची दारू, २८ हजार रुपये किंमतीच्या गुळाच्या पावडरच्या ४० बंद गोण्या व २ हजार रुपये किंमतीचा नवसागर, दारू बनविण्यासाठी लागणारी भांडी व इतर साहित्य असा ९४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात पोलीस चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजेश चोळेकर व त्याच्या ३ सहकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोळेकर याला अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस जाधव करत आहेत.