ठाणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी नारपोली पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या घटनेचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखा-घटक २ पोलीस पथक करत होते. दरम्यान, या दुचाकी चोरीच्या घटनेतील गुन्ह्याच्या अनुषंगाने दोन चोरटे भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाक्यावर येणार असल्याची खबर भिवंडी गुन्हे शाखा पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.
एक साथीदार फरार: दरम्यान अटक चोरट्यांनी पालघर जिल्ह्यातील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रिक्षा चोरी केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. याआधारे त्यांनी अधिक चौकशी केली असता चोरट्यांनी त्यांचा अन्य एक फरार साथीदार आकाश जयवंत पाटील (रा. वसई,पूर्व) याच्या सोबतीने रिक्षांची चोरी केल्याची कबूली दिली. फरार आरोपी आकाशवर पेल्हार आणि वालीव पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे 6 गुन्हे दाखल असून गुन्हे शाखेचे पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत.
६ रिक्षांसह आणि 1 मोटारसायकल जप्त: ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सपोनि धनराज केदार, पोऊनि शिंगे, चव्हाण, वाघमारे, सपोउनि रामचंद्र जाधव, तडवी, पो.ह. शिर्के, थोरात, शिंदे, पाटील, शेख, पाटील, यावद, साळवी, पोना जाधव, डोंगरे, खताळ, पो.शि. साळुंखे, सोनवणे, बर्वे, जाधव, इंगले, घरत, चालक साळुंखे या गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने केली आहे. अटक चोरट्यांकडून ३ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ६ रिक्षांसह आणि 1 मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
डोंबिवलीत चोरांचा धुमाकूळ : कल्याण डोंबिवलीत चोरांनी धुमाकूळ घातला आहे. 21 एप्रिल रोजी डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर्ली चोळेगाव परिसरात रिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी घटनेच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे ही रिक्षा चोरतांना पोलिसांना दिसले. यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला. कल्याण पूर्वेतील पिसवली परिसरात दोन्ही चोरटे चोरीच्या रिक्षांचे ऑटो पार्ट्स विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार रामनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनि योगेश सानप, हवालदार नीलेश पाटील, प्रशांत सरनाईक, इतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही चोरट्यांना अटक केली.