ठाणे- 2 कोरोना पॉझिटिव्ह असलेले सराईत आरोपी उल्हासनगर येथील महापालिकेच्या कोविड रुग्णालयातून फरार झाले आहे. आरोपींनी रुग्णालयाच्या खिडकीलगत असलेल्या झाडाच्या फांद्यांचा आधार घेऊन पळ काढला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात फरार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
अभिषेक उर्फ राहुल बारक्या पटेल (वय १९) आणि मुकेश उर्फ आर्यन जगताप (वय २४) असे कोरोनाग्रस्त फरार आरोपींची नावे आहेत. उल्हासनगर कॅम्प नंबर ५ च्या टेऊराम धर्मशाळेत महापालिकेचे कोविड रुग्णालय आहे. या रुग्णालयात आरोपी राहुल बारक्या आणि मुकेश जगताप हे दोघेही आरोग्य तपासणीत कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांच्या देखरेखी खाली त्यांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे, एका घरफोडीच्या गुन्ह्या नंतर हे दोन्ही आरोपी पॉझिटिव्ह आढळून आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांनी रुग्णालयातील बाथरूमच्या खिडकीलगत असलेल्या झाडाच्या फाद्यांचा आधार घेऊन रुग्णालयातून पळ काढला.
दरम्यान, हे दोन्ही आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्याकडून इतरांना धोका होण्याची शक्यता आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याणच्या विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कोरोनाबाधित आरोपींना पोलिसांची 3 पथके शोधत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
हेही वाचा- मेजर कौस्तुभ राणे यांचा आज दुसरा स्मृतीदिन, स्मारकाला अभिवादन