नवी मुंबई: जगभरात कोरोनाने थैमान घातले असून, कित्येक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनामुळे कित्येकांचे बळीही गेले आहेत. उरण तालुक्यातील जासई मधील 18 महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरविले असून तो ठणठणीत बरा झाला आहे. त्याला आज 27 एप्रिलला डिस्चार्ज देण्यात आला.
मागील सोमवारी उरण तालुक्यातील जासई येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. ते फक्त 18 महीने बाळ होते. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या बाळाला अशाप्रकारे कोरोनाची बाधा झाल्याची घटना घडली होती. त्या बाळाला कामोठे येथील एम. जी. एम. रुग्णांलयात दाखल केले होते. मात्र आठवड्याभरातचं त्या चिमुकल्याने कोरोनाला हरवले असून, त्यातून ते बाळ पूर्णपणे बरे झाले आहे. आज संध्याकाळी कोविड 19 विरोधातील लढाई जिंकलेल्या त्या बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त गणेश देशमुख, प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांच्यासह डॉक्टर्स परिचारिका यांनी टाळ्या वाजून या बाळाचे अभिनंदन केले.