ठाणे- विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तब्बल १३ हजार पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मतदान भयमुक्त व सुरळीत पार पडावे म्हणून सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी अविरत ४८ तास 'ऑन ड्युटी' राहणार आहेत. त्याचबरोबर, सर्वच मतदारसंघात फ्लॅग मार्च पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज्यासह ठाणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा व सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ५४०२ शस्त्रे जमा करण्यात आली. मतदान काळात कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.
मतदानाच्या दिवशी ठाणे पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त व सहपोलीस आयुक्त यांच्यासह चार अपर पोलीस आयुक्त, ९ पोलीस उपायुक्त, १६ सहाय्यक पोलीस आयुक्त, १२० पोलीस निरीक्षक, ४०० पोलीस उपनिरीक्षक, ९ हजार १०८ पोलीस कर्मचारी, ३५२६ होमगार्ड, १८ सेंट्रल फोर्सच्या तुकड्या, असे सुमारे १३ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे.
हेही वाचा- 'पुन्हा अन्याय झाला तर माझ्याकडे येवू नका'