ठाणे - फॉलिक अॅसिड टॉनिकचा ओव्हरडोस झाल्याने 13 विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब याची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहापूर तालुक्यात किन्हवली विभागातील सोगाव येथील अंगणवाडीत हा प्रकार घडला आहे. अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे तसेच त्यांच्या शरीरातील रक्तात वाढ व्हावी यासाठी आरोग्य विभागातून फॉलिक अॅसिड टॉनिक दिले जाते.
तेरा विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थ्यांना टाकीपठार प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर ६ विद्यार्थ्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विद्यार्थी शहापूर तालुक्यातील सोगाव अंगणवाडीत बुधवारी सकाळी गेले होते. विद्यार्थ्यांच्या शरीरात योग्य प्रमाणात रक्त वाढ व्हावी यासाठी या अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना फॉलिक अॅसिड या टॉनिकचा डोस देण्यात येतो. त्याप्रमाणे सोगाव येथील आशा वर्कर आणि उज्वला चौधरी यांनी या अंगणवाडीतील १३ विद्यार्थ्यांना टॉनिकचा डोस दिला. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त डोस देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास झाला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना टाकीपठार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यापैकीच हर्षला गावंडा, वैष्णवी हिरवा, रवीना पारधी, विशाल पारधी, ओंकार गावंडा आणि कौस्तुभ हिरवे या विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार फॉलिक अॅसिड या टॉनिकचा जादा डोस दिल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मात्र, शिल्लक असलेल्या टॉनिकचा साठाही तपासणी करण्यात येणार आहे. तसेच याबाबत चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तरुलता धानके यांनी सांगितले.