ठाणे - कल्याण डोंबिवलीत आज आढळलेल्या 12 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी आठ रुग्ण मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असून दोन रुग्ण बाधित रुग्णांच्या निकट सहवासातील आहे. मात्र, उर्वरित दोन रुग्णांना कोरोनाची लागण कशी झाली, याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे. तर आज दिवसभरात नऊ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 181 पोहचली असतानाच त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 60 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 118 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आज आढळलेल्या 12 रुग्णांपैकी मांडा-टिटवाळा परिसरातील दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. मात्र, यातील एक महिला व एका पुरुषाला कोरोनाची लागण कशी झाली, याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे. डोंबिवली पूर्वेत दोन पुरुष, कल्याण पश्चिमेत तीन पुरुष, कल्याण पूर्वमध्ये तीन पुरुष कोरोना बाधित असल्याचे आज आढळून आले आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत रुग्णांची विगतवारी पाहता कल्याण पूर्व मध्ये 37, कल्याण पश्चिमेत 24, डोंबिवली पूर्वमध्ये 61, डोंबिवली पश्चिमेत 43, मांडा-टिटवाळा भागात 10 तर मोहने येथे सहा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - 'पनवेल 4 मेपासून बंदचा तो व्हायरल मेसेज खोटा, असा कोणाताही निर्णय नाही'