ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या महिन्याभरापासून ४५० ते ५५० च्या जवळपास रुग्णांची संख्या दरदिवशी वाढतच आहे. अशातच एक दिलासादायक बातमी महापालिकेच्या कोविड रुग्णालयात घडली असून या ठिकाणी उपचार घेणाऱ्या आनंदीबाई पाटील या १०६ वर्षाच्या आजीबाईंनी कोरोनावर मात करून आपणही कोरोनाला हरवू शकतो असे दाखवून दिले आहे.
विशेष म्हणजे त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या वाढत्या वयामुळे अनेक खासगी रुग्णालयांनी त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याची माहिती आजीबाईच्या नातेवाईकांनी दिली. परंतु डोंबिवलीतील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील, महापालिकेच्या कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले यांनी त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले. आज उपचाराअंती या आजीबाई कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यास वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अथकपणे काम करणारे महापालिका प्रशासन, डॉ. राहुल घुले यांचेवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले आहे. अशातच १०६ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेस कोरोनामुक्त होऊन डिसचार्ज मिळणे ही खचितच सकारात्मक आणि समाधानकारक बाब असल्याची भावना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या घटनेची दखल घेत, ट्विट करून महापालिका प्रशासन व डॉ. राहुल घुले यांचे कौतुक केले आहे.