पंढरपूर (सोलापूर) - सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक विधयक बील रद्द करावे, शेतकऱ्यांना न्याय द्या, या प्रमुख मागण्यासाठी कृषी विषयक प्रत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा गढवाच्या गळ्यात बांधून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पंढरपुरातही आज सकाळी सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली येथील स्टेशन रोडवर सुधारित कृषी विधेयकाला विरोध करत मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
शेती सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आता या विधेयकाच्या विरोधात देशभरात शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. यामध्ये आता काँग्रेसनेही उडी घेत मोदी सरकारच्या या सुधारित शेती विधेयकाच्या विरोधात आंदोलन पुकारले आले. या विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्रातही जिल्हा युवक काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हाध्यक्ष नितीन नागणे म्हणाले, की मोदींनी सुधारित कृषी विधेयक आणून देशातील कृषी बाजारपेठच मोडीत काढली आहे. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी विरोधी विधेयक मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडू. येत्या आठ दिवसांत केंद्र सरकारने फेरविचार करून विधेयक मागे घ्यावे; अन्यथा जिल्हा युवक कॉग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनामध्ये संदीप शिंदे, सोमनाथ आरे, कृष्णा कवडे, समाधान पोळ, विशाल बोडके, सोमनाथ क्षीरसागर, संदीप गायकवाड आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.