सोलापूर- शहरातील एका तरुणीला पंचवीस लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे आमिष दाखवण्यात आले. 25 लाखांसाठी जीएसटीची रक्कम भरावी लागेल, असे म्हणत तरुणीला 1 लाख 69 हजार रुपयांना फसवण्यात आले आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्ती विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. रेश्मा रवी राठोड(वय 25 रा,घोडा तांडा, कुमठे, सोलापूर) या तरुणीने 14 ऑगस्ट रोजी रात्री विजापूर नाका पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे.
10 ऑगस्ट रोजी रेश्मा राठोड या तरुणीला एका व्यक्तीचा कॉल आला. तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. व्हाट्सएप द्वारे 25 लाख रुपयांचा लकी ड्रॉ लागलेला आहे, असे तिला सांगण्यात आले. यानंतर तरुणीने तिच्या बहिणीशी याबाबत चर्चा केल्यानंतर त्या खोट्या कॉलला प्रतिसाद देत त्या अनोळखी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवला.
अनोळखी व्यक्तीने अतिशय चतुरपणा दाखवत तरुणीला पैसे भरण्यास सांगितले. 25 लाख रुपयांची रक्कम देण्यासाठी जीएसटी भरावा लागेल, अशी थाप मारत पैशांची मागणी केली. तक्रारदार तरुणीने विश्वास ठेवून 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान त्या व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यावर 1 लाख 69 हजार रुपये भरले. तरुणीने पंचवीस लाख रुपयांची रक्कम कधी मिळणार, अशी विचारणा केली आणखी 1 लाख रुपये मागण्यात आले. रेश्मा राठोड या तरुणीने पैसे संपले आहेत, असे सांगितले. त्यावेळी 20 हजार तरी भरा असे त्या अनोळखी व्यक्तीने सांगत 80 हजार भरणार असल्याचे उत्तर दिले.
तरुणीला यानंतर काहीही रक्कम ऑनलाइन रित्या प्राप्त झाली नाही. 1 लाख 69 हजार 600 रुपयांची फसवणूक झाली असल्याचा संशय त्यांना आला. दोनच दिवसांत अनोळखी व्यक्तीने थापा मारुन एवढी मोठी रक्कम उकलळी. शेवटी 14 ऑगस्ट रोजी तरुणीने विजापूर नाका पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना फसवणूक कशी झाली याची हकीकत सांगितली. पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार घुगे करत आहेत.