सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील चळे येथे घरावरील पत्र्यावर पडलेले चिल्लारीचे झाड काढण्याच्या कारणातून झालेल्या भांडणात महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव वसंत खिलारे, सिद्धेश्वर वसंत खिलारे, अण्णा सिद्धेश्वर खिलारे, विष्णू सिद्धेश्वर खिलारे (रा. चळे ता. पंढरपूर) अशी गुन्ह्यातील व्यक्तींची नावे आहेत.
हेही वाचा - श्री विठ्ठल रुक्मिणी समितीकडून शेकडो वर्षाच्या मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुल्या
झाड काढण्यावरून वाद
घरावरील पत्र्यावर पडलेले चिलारीचे झाड काढण्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या खिलारे कुटुंबाकडून वाद सुरू करण्यात आला, तसेच मागील भांडणाचा मनात राग धरून तक्रारकर्त्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने महिलेला मारहाण केली. त्यानंतर महिलेला सोडवण्यासाठी गेलेल्या वडिलांनाही महादेव खिलारे याच्याकडून 'तू मधी येतो काय, तुला जीवेच मारतो' असे म्हणून डोक्यात दगड मारून जखमी करण्यात आले. तर, सिद्धेश्वर खिलारी याने दगड मारून तक्रारकर्त्या महिलेच्या आईला जखमी केले. त्यानंतर महिलेच्या घरी आलेल्या मामाच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करण्यात आली. त्या दगडफेकीत मामा गंभीर जखमी झाला आहे. खिलारे कुटुंबातील चौघा जणांनी दगड, लोखंडी गज, प्लास्टिक दांडक्याचा मारहाणीसाठी वापर केला.
४ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यातील महादेव वसंत खिलारे हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच्यावर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
हेही वाचा - पंढरपूर - अपहरण प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल