सोलापूर (माढा) - तालुक्यातील वेताळवाडी गावात एका ५३ वर्षीय महिलेने शेतातील कडब्याच्या गंजीत पेटवून घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीला आली. ललीता औदुंबर खोत असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
वेताळवाडी शिवारात बाळू चिंतामणी खोत यांचे शेत आहे. याच शेतातील ज्वारीच्या कडब्याच्या गंजीत ललीता खोत यांनी पेटवून घेतले. याबाबत माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक किरण घोगडे, एएसआय रमेश मांदे यांच्यासह पोलीस पथकाने घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला. नातेवाईकांनी ललिता या मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांना दिली. सखाराम लिंबाजी खोत यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, या महिलेने आत्महत्या केली की कुणी हत्या केली याचे गूढ कायम आहे.
पेटवून घेणारी अथवा पेट घेतलेली व्यक्ती जीव वाचवण्यासाठी धडपडत असते. मात्र, घटनास्थळी अशी कोणतीही चिन्हे प्राथमिक तपासणीअंती पोलिसांना दिसली नाहीत. माढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद बोबडे यांनी घटनास्थळी जाऊन शवविच्छेदन केले. ललीता खोत यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक किरण घोगडे करत आहेत. गावात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ललीता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.