सोलापूर (माढा) - शेतीचा विचार केला की, अनेकजण नकारार्थी बोलतात. किंवा शेतीच्याबाबत बऱ्याचदा अनास्था दिसते. मात्र, योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाच्या जोरावर शेती केल्यास शेती नक्की यशस्वी ठरते. केवळ २५ गुंठे क्षेत्रात चक्क १४ लाख १० हजाराचे उत्पन्न मिळवण्याची किमया माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील भारत जाधव या शेतकऱ्याने हासील करुन दाखवली आहे. इतके भरघोस उत्पन्न मिळवलेले पाहून अन्य डाळिंब उत्पादक शेतकरी आवाक झाले आहेत. मात्र, ही जाधव यांची वस्तुस्थिती आहे.
डाळिंब केरळ मध्ये पोहचले
रासायनिक शेतीला बगल देऊन सेंद्रीय पद्धतीने लागवड केलेल्या जाधव यांना २५ गुंठ्ठे क्षेत्रात १८ टन माल निघाला आहे. १६ टन माल केरळला निर्यात करण्यात आला आहे. तर, २ टन जिल्ह्याच्या बाजारपेठेत विकला गेला आहे. खत, औषधे, मजुरी यासह अन्य असा २ लाखांचा खर्च झाला आहे. भगव्या डाळिंबाच्या जातीतून कमी क्षेत्रात भरघोस उत्पन्न मिळवलेले शेतकरी जाधव आता चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेली डाळिंब शेती पाहण्यासाठी शेतकरी बहुसंख्येने आवर्जुन येत आहेत. जाधव अनेक वर्षे आपल्या शेतात ज्वारी, मका यासह अन्य पारंपरिक पिके घेत होते. भारत यांना शेतीत गुरु भेटला आणि त्यांनी डाळिंब पिकाची नवी वाट धरली. यापुर्वी शंभर टक्के रासायनिक पद्धतीने शेती करणाऱ्या भारत जाधव यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्यास सुरुवात केली. यंदा सेंद्रियतेचा वापर करून डाळिंब लागवडीसाठी केला. कोरोना प्रादुर्भाव आणि त्यातच पडलेले लॉकडाउन याचा सर्वात मोठा फटका शेतीमालाला बसत आला आहे.
डाळिंबावर तेल्या रोग
काबाडकष्ट करुन शेतात पिकविलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने, माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ बळीराजावर आली आहे. अशा विदारक स्थितीत अवघ्या २५ गुंठे क्षेत्रात जाधव यांनी केलेल्या डाळिंब शेतीतून त्यांची लाखमोलाची प्रगती झाली. डाळिंबावर पडत असलेल्या तेल्या रोगाने हैराण झालेले शेतकरी डाळिंबाच्या बागा काढत असताना नियोजनबद्ध शेतीच्या जोरावर जमिनीच्या लहानश्या तुकड्यातून भारत जाधव यांनी कोरोना काळात मिळवलेले उत्पन्न निश्चितच इतर शेतकऱ्यांपुढे आयडाॅल ठरतील, असे म्हटले तर काहीच वावगे ठरणार नाही.
डाळिंब ८८ रुपये दराने केरळला पोहचला-
भारत जाधव यांचे उपळाईच्या शिवारात २७ गुंठ्ठे जमिन आहे. त्यातही चारही बाजूने बांध असल्याने केवळ २५ गुठ्ठे क्षेत्रावरच पीक घेता येते. जाधव यांनी २६० डाळिंबाची झाडे लावली होती. एका झाडाला प्रत्येकी जवळपास ३०० ते ४०० डाळिंब लागली असून यातून १८ टन माल निघाला आहे. ज्याला ८८ रुपये प्रति किलो दर मिळाल्याने भारत जाधव मालामाल झाले आहेत.
मरीसाठी योग्य खताची मात्रा,१५ झाडे दगावली-
मरी रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जाधव यानी बुरशी नाशक औषधाचा मात्रा देत विशेष काळजी घेतली. एकूण २७५ झाडांमधून त्यांची १५ झाडे मरी मुळे दगावली गेलीत. भगव्या डाळिंबाच्या जातीतून २६० झाडामधून त्यांना हे उत्पन्न हाती आले आहे.
लागवडीला फाटा देऊन डाळिंब शेतीकडे वळायला हवे
शेतीला नुकसान कारक समजणे हा फार गैरसमज आणी चुक ठरत आहे. योग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रयत्नाची पराकाष्टा केल्यास काहीच अशक्य नाही. पारंपरिक पिक लागवडीला फाटा देऊन डाळिंब शेतीकडे वळायला हवे. मला तर डाळिंबाने भरपुर आर्थिक समृध्दी मिळवून दिली आहे. मी फार समाधानी आहे अशी भावना शेतकरी जाधव यांनी व्यक्त केली आहे.