सोलापूर - सोलापूर शहर आणि ग्रामीणमध्ये कलम 144अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सोलापूर शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येक शनिवार-रविवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. म्हणजेच शहर आणि जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 7पर्यंत परवानगी
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्बंधात अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीत राहणार आहेत. ग्रामीण भागाचा हे आदेश 31 मार्चपर्यंत लागू असतील तर शहरासाठी पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश लागू असेल.
सोलापूरच्या ग्रामीण भागातदेखील विकेंड लागू
जिल्ह्यातील सर्व आठवडी आणि जनावर बाजार बंद राहणार आहेत. तसेच सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत सुरू राहणार आहेत. सर्व धार्मिक विधीसाठी 5पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी देण्यात आली नाही. जिल्ह्यातील 11 तालुक्यात शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस सर्व व्यवहार, आस्थापना बंद राहणार आहेत. आठवड्यातून दोन दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा शहर आणि जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
होळी आणि रंगपंचमी साजरा करण्यावर निर्बंध
सोलापुरात मोठ्या उत्साहाने होळी, धुळवड आणि रंगपंचमी साजरी केली जाते. या सणांवरदेखील सोलापूर मनपा प्रशासनाने नियमावली लागू केली आहे. शहरातील नागरिकांनी होळी, धुळवड आणि रंगपंचमीसारखे सण घरात राहून साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. 29 मार्च रोजी होळी आणि 2 एप्रिल रोजी रंगपंचमी सण आहे. गेल्यावर्षीसारखे यंदाच्या वर्षीदेखील सणांवर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. खाद्यगृह, बियरबार आणि परमिट रूम मात्र सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सुरू राहतील, आदेशात नमूद केले आहे. धार्मिक स्थळे मात्र सकाळी 7 ते रात्री 7पर्यंतच सुरू राहतील.