सोलापूर - रब्बी हंगामासाठी उजनी धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. 5 जानेवारी पासून बोगद्यामधून तर 15 जानेवारी पासून कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
हेही वाचा - 'युजीसी'च्या परिपत्रकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून केराची टोपली
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उजनी धरणातील पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांसाठी बोगदा व कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. शेतीसाठी पाणी सोडताना 5 जानेवारीपासून सीना-माढा बोगदा तर 15 जानेवारीपासून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. उन्हाळ्यात पिकांसाठी पाण्याची गरज व धरणातील उपलब्ध पाणी पाहता, 2 वेळा पाणी सोडण्याची मागणी बैठकीस उपस्थित आमदारांनी केली.
हेही वाचा - सोलापूर-नागपूर स्लीपर कोच 1 महिन्यासाठी रद्द
या बैठकीस आमदार बबनराव शिंदे, आमदार भारत भालके, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त दीपक तावरे यांच्यासह सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
7 फेब्रूवारीला सोलापूर शहरासाठी पाणी सोडणार -
सोलापूर शहराची तहान देखील उजनी धरणावरच अवलंबून आहे. उजनी धरणावरून थेट पाईपलाईनद्वारे सोलापूर शहरात पाणी आणले जाते. तसेच भीमा नदीतून देखील सोलापूर शहराला पाणी सोडावे लागते. 7 फेब्रूवारी पासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.