सोलापूर - उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात भीमानदीला पूर आला आहे. नदीकाठच्या सखल भागात पाणी साचले असून अनेक झोपडपटट्यांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. तर येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व प्रशासन यांच्या मदतीने पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
आज सकाळी वीर धरणातून ७० तर उजनी धरणातून १ लाख ५० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपुरात भीमानदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या व्यासनारायण, अंबाबाई पटांगण, लखुबाई आदी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. येथील सुमारे ७०० कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्तलांतरीत केले आहे.
स्थलांतरीत करण्यात आलेल्या पूरग्रस्तांसाठी प्रशासनाने निवाऱ्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. तर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने या पूरग्रस्तांना गहू, तांदुळ, दाळ, साखर, तेल अशा जवळपास ५ ते ६ क्विंटल अन्नधान्याचे वाटप केले आहे. पूरग्रस्तांसाठी मंदिर समिती धावून आल्याने शहरातील गरीब नागरिकांना मोठी मदत झाली आहे.
नदीकाठी असलेल्या सर्व नागरीक व तरूणांनी अतीउत्साहाच्या भरामध्ये नदी पात्रालगत जाऊ नये तसेच पाण्याच्या पात्रालगत, पुलाच्या कडेला जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु नये. जेणेकरुन जीवितास कोणताही धोका होणार नाही, असे कृत्य करणे टाळावे आणि प्रशासनला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.