सोलापूर- राज्याचे लक्ष लागून असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील गटाने आपली सत्ता कायम राखली आहे. 17 पैकी 14 जागा जिंकून एकहाती सत्ता या गटाने मिळवली. मात्र, पुतणे संग्राम सिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला आहे. मोहिते-पाटील गटाची अवस्था गड आला, पण सिंह गेला अशी झाली आहे.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना दे धक्का
संग्रामसिंह यांचा पराभव मोहिते पाटील यांच्या जिव्हारी
अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी चुरस होती. विरोधी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आवाहन उभे केले होते. निवडणुकीत धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी उर्वशी मोहिते या बिनविरोध निवडून आल्या. धवलसिंह मोहिते पाटील गटातील ज्योती कुंभार आणि गिरीराज माने देशमुख यांनी वॉर्ड क्रमांक तीन मध्ये विजय मिळवला आहे. येथे जयसिंह मोहिते पाटील याचे पुत्र संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा धक्कादायक परावभव झाला आहे. संग्रामसिंह यांचा पराभव मोहिते पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे, गड आला, पण सिंह गेला अशीच काहीशी स्थिती विजयसिंह मोहिते पाटील गटाची झाली आहे.
अकलूज येथे मोहिते पाटील गटाकडून आत्मचिंतन होणार
धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, अकलूज येथील तीन नंबर वॉर्ड मधून संग्रामसिंह यांचा पराभव झाल्यामुळे गड आला, पण सिंह गेला या म्हणी प्रमाणे झाले. त्या वॉर्डात आम्ही अनेक प्रकारची विकास कामे केली. मात्र, या पराभवामुळे मोहिते पाटील गटाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मात्र. माळशिरस तालुक्यामध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे.
प्रतापसिंह मोहिते पाटील गटाचा मताचा टक्का वाढला
धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले, अकलूज येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील गटाला अकलूजकरांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. व आमच्या मतांचा टक्का वाढला तर आमच्या सदस्यांची संख्याही वाढली आहे. अकलूज येथील निवडणूक सर्वसामान्य जनतेसाठी लढवली असल्याचे त्यांनी सांगितले. माजी उपमुख्यमंत्र्यांपासून ते आमदार असणाऱ्या मोहिते-पाटील गटातील नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यावरून हा आमचा विजय असल्याचे दिसून येत, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - सर्व जागा जिंकत 'आरपीआय'ची बॅगेहळ्ळीत विरोधकांना धोबीपछाड