सोलापूर - विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करत छापा मारला. यामध्ये 96 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
महिबूब उर्फ दौला चांदसाब मुजावर (वय 38 रा, साईनाथनगर सोलापूर), इम्रान अहमद पटेल (वय 29 रा. बेघर वसाहत, मजरेवाडी, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागली होती. घरगुती गॅस अवैधरित्या तीन चाकी वाहनांमध्ये भरला जात होता. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी आपल्या पथकासह 12 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास साईनाथनगर येथील गॅस धंद्यावर छापा टाकला. त्यावेळी संशयित दोन्ही आरोपी घरगुती गॅस इंधन म्हणून रिक्षामध्ये भरत असताना आढळून आले.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरगुती गॅस टाक्या, वजन काटा, इलेक्ट्रिक मोटार, एक रिक्षा असा एकूण 96 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गॅसचा काळाबाजार करणाऱ्यां विरोधात कारवाई करून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे करत आहेत.
घरगुती गॅस टाक्यांचा काळाबाजार होताना नेहमी कारवाई केली जाते. परंतु, ह्या गॅस टाक्या काळ्या बाजारात येतात कशा हे देखील महत्वपूर्ण आहे. कारण, घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करणारे फेरीवाले चढ्या दराने व ब्लॅकने या टाक्या काळा बाजार करणाऱ्या संशयित आरोपींना विकतात. म्हणूनच हा काळा बाजार होतो. यावर देखील कारवाई होणे गरजेचे आहे.