अकाेला - काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी लागू करण्यात आलेली टाळेबंदी आता शिथिल हाेत आहे. राज्यातील मंदिरे एक सप्टेंबरला उघडण्याची परवानगी सरकारने दिली नाही तर विश्व वारकरी सेनेने मंदिरात घुसण्याचा इशारा दिला आहे. २६ ऑगस्टपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास एक लाखांवर वारकरी राज्यभरातून मंदिरात घुसतील, असा इशारा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर १७ मार्चपासून बंद करण्यात आले होते. या पाच महिन्याच्या काळात चैत्र व आषाढी या दोन मोठ्या यात्रा भाविकांच्याविना करण्यात आल्या. मंदिर सुरू करण्याबाबत वारकरी संप्रदाय आग्रही असून भक्तांसह इतरही जण मंदिर सुरू होण्याची वाट पाहत आहेत.
२२ ऑगस्ट राेजी विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी मंदिर भक्तांसाठी उघडी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. दारुची दुकाने सुरु असली तरी मंदिर मात्र बंद आहेत. सरकाराला दारुडे शिस्तीने वागतील, खरबदारी घेतील, याबाबत विश्वास आहे आणि भक्तांवर विश्वास नाही काय, असा सवाल वारकरी सेनेने उपस्थित केला. राज्य सरकारमधील प्रमुख नेते, त्यांच्या स्वीय्य सहाय्यकांशी सपंर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यातून सकारात्मक परिणाम समाेर आलेले नाहीत. त्यामुळे यावर सरकारने निर्णय न घेतल्यास आंदाेलन करावे लागेल, असा इशारा विश्व वारकरी सेनेने दिला आहे. या पत्रकार परिषदेला विदर्भाचे अध्यक्ष हभप विठ्ठल महाराज साबळे, अकाेला जिल्हाध्यक्ष हभप प्रवीण महाराज कुलट, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अड. प्रकाश आंबेडकर प्रामुख्याने उपस्थित हाेते.