सोलापूर - मार्कंडेय सहकरी रुग्णालयात बुधवारी (दि. 25 मार्च) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट होऊन एक रुग्ण व एका रुग्णाचे नातेवाईक, असे दोन जण दगावले असल्याची माहिती समोर आली आहे. पण, रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सुनील लुंगारे (वय 71) हे रुग्ण कोरोनाग्रस्त होते. कोविडमुळे दगावला आहे. तर हनुमंत क्षीरसागर (वय 35 वर्षे, रा. बाळे,सोलापूर) हे उपचारासाठी दाखल असलेल्या त्यांच्या आईला भेटायला आले होते. संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे मार्कंडय सहकारी रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
मार्कंडेय रुग्णालयाने फेटाळले आरोप
बुधवारी रात्री झालेल्या ऑक्सिजन टाकीच्या स्फोटात दगावलेल्या मृत व्यक्तींबाबत विचारले असता रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम म्हणाले, मृत हनुमंत क्षीरसागर हे उपचारासाठी दाखल असलेल्या त्यांच्या आईला भेटण्यासाठी आले होते त्यावेळी हा अपघात झाला. यामध्ये रुग्णालय प्रशासन कसा जबाबदार असणार. तसेच सुनील लिंगारे हे कोरोनाग्रस्त होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन स्फोटामुळे किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सुनील लिंगारे यांचा मृत्यू झाला नसल्याची माहिती डॉ. गुर्रम यांनी दिली.
मार्कंडेय रुग्णालयावर गुन्हा दाखल करा, नातेवाईकांची मागणी
मृत हनुमंत क्षीरसागर हे शेतीचे काम करत होते. त्यांच्या आईला न्युमोनिया झाला होता. त्यामुळे त्यांना मार्कंडेय सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. बुधवारी रात्री ते आपल्या पत्नी सोबत रुग्णालयात आले होते. पावणे अकराच्या सुमारास जेवण करताना ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाला. यामुळे पांढरी पावडर सर्वत्र पसरली. रुग्णालयाच्या आवारातील रुग्णांचे सर्व नातेवाईक हे पांढऱ्या पावडरने माखले होते. हनुमंत क्षीरसागर हे यामध्ये जखमी झाले होते. त्यांना ताबडतोब उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, रात्री 3 वाजण्याच्या सुमारास हनुमंत क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. त्याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आले आहे. मृत सुनील लिंगारे यांच्या पत्नीने देखील रुग्णालय प्रशासनावर आरोप केला आहे. ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने सुनील लिंगारे यांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - 'राज्यात पुन्हा पहाटेचा शपथविधी होईल की दुपारचा, सांगता येत नाही'