पंढरपूर (सोलापूर) - कार्तिक वारी ही कोरोना संकटकाळात तसेच आचारसंहितेच्या कालावधीत पार पडत आहे. यात्रा कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दोन दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. कार्तिकी दशमी आणि एकादशी पंढरपूर शहरात वारकऱ्यांना प्रवेश नसला तरी बंदोबस्तासाठी शेकडोंच्या संख्येने पोलिस दाखल झाले आहेत. आजपासून विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन तीन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.
पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना व भक्तांना दोन दिवस येण्यास मनाई
शहरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी 24 नोव्हेंबर रात्री 12.00 ते 26 नोव्हेंबर रात्री 12.00 या कालावधीत पंढरपूर शहर व शहरालगतच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मठामध्ये बाहेरील भाविक राहणार नाहीत यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. नगरपालिकेने व मंदीर समितीने सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक तेथे बॅरीकेटींग करण्यात आले आहे. शासकीय निवासस्थान येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने बॅरेकेटींगव्दारे बंद आहेत. मंदिर समितीने सर्व विधी पार पाडताना कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन पार पडणार आहेत. तसेच आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
चंद्रभागा स्नानास बंदी
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वारी कालावधीत चंद्रभागा स्नान करुन कळसाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येतात. यासाठी 21 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2020 या कालावधीत चंद्रभागा स्नान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. खासगी रथोत्सावाची मिरवणूक नगरप्रदक्षिणा मार्गावरुन साध्या पद्धतीने व सामाजिक अंतराचे पालन करुन काढण्यात येईल याची दक्षता घ्यावी. स्नानासाठी बंदी असल्याने चंद्रभागा घाटावर तसेच नदीपात्रात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पंढरीत विविध ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा
कार्तिक वारीत बाहेरील भाविक व नागरिक पंढरपूरात येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून त्रिस्तरीय नाकाबंदी ठेवण्यात आलेली आहे. संचारबंदीच्या कालावधीत शहरातील नागरिकांनी विनाकारण फिरु नये. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर थांबवून प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. बाहेरील नागरिकांना अथवा भाविकांना तेथूनच परत पाठवण्यात येणार आहे. यात्रेसाठी वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास मज्जाव करण्यात आला असला तरी बंदोबस्तासाठी सुमारे 1700 पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत. दोन दिवस जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. जिल्हा, तालुका आणि शहराच्या हद्दीवर नाकाबंदी पाईंट कार्यरत करण्यात आले आहेत.
लॉज चालकांना नोटिसा
25 आणि 26 असे दोन दिवस शहरात संचारबंदी असली तरी शहरातील मठांमधून आणि लॉजमधून आधी कोणी येऊन राहू नये यासाठी मठ आणि लॉज मालकांना मठ आणि लॉजमधून कोणालाही राहण्यास देऊ नये, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा आशयाच्या नोटिसा पोलिसांनी बजावल्या आहेत. त्यामुळे यात्रा काळात ज्या लॉजमधून नेहमीपेक्षा दुपटीने, तिपटीने दर आकरणी करून रूम भाड्याने दिल्या जात असत, त्या रूम सध्या कुलूप लावून बंद ठेवण्याची वेळ लॉज मालकांवर आली आहे. 25 आणि 26 रोजी एसटी वाहतूक सुरू राहणार असली तरी केवळ पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांनाच ओळखपत्र पाहून पंढरपूर शहरातील त्यांच्या घरी अथवा कामावर जाण्यास परवानगी दिली जाणार आहे.
उपमुख्यमंत्र्यांबरोबर सहापैकी एक विणेकरी करणार शासकीय पूजा
गुरुवार पहाटे एक वाजता श्री विठ्ठल - रुक्मिणीची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्यांच्या हस्ते केली जाईल. त्यानंतर दोन वाजून वीस मिनिटे ते तीन या वेळात श्री विठ्ठलाची तर तीन ते साडेतीन या वेळात श्री रुक्मिणी मातेची महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक होईल. त्यानंतर पवार यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्याचा आणि मंदिर समितीच्या वतीने पवार यांचा सत्कार होईल. आषाढी यात्रेच्या वेळी एकादशीला भक्तांना प्रवेश नव्हता, त्यामुळे मंदिर समितीच्या सहा विणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून एकाची मानाचा वारकरी म्हणून निवड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यंदा कार्तिकी एकादशी दिवशी मंदिरातील विणेकऱ्यांच्या चिठ्ठ्या टाकून त्यांच्यापैकी एकाला श्री विठ्ठल - रुक्मिणीच्या शासकीय महापूजेच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान दिला जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील तथा विठ्ठल जोशी यांनी दिली.
कर्मचाऱ्यांची व सदस्यांची कोरोना तपासणी
कार्तिक एकादशी दिवशी विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजा निमित्ताने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पंढरपूर मध्ये येणार आहेत. त्यादृष्टीने विठ्ठल मंदिर समितीच्या पंचावन्न कर्मचाऱ्यांनी तर वीस सदस्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली आहे व या सर्वांचा अहवाल आज प्राप्त होणार आहे.
हेही वाचा - वीज बिलांच्या मुद्द्यावरून औरंगाबादेत मनसे आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा
हेही वचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बीएमसी सज्ज