पंढरपूर - मोक्का केससह खून, दरोडे, जबरी चोरी अशा अनेक गुन्ह्यांतील दोन सराईत दरोडेखोरांच्या पंढरपूर तालुका पोलिसांनी मंगळवारी मुसक्या आवळल्या. आरोपी शत्रुघ्न अनंता काळे, भारत अनंता काळे अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांत गुन्हे दाखल असलेले सराईत दरोडेखोर शत्रुघ्न अनंता काळे, भारत अनंता काळे आणि त्यांच्या अन्य साथीदारांचा 2017 पासून पोलिस शोध घेत होते. परंतु ते सापडले नव्हते. २ नोव्हेंबरच्या सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुक्याती पुळुज या ठिकाणी शत्रुघ्न काळे आणि भारत काळे या दोघांनी त्यांच्या एका नातेवाईकास कुऱ्हाड आणि दगडाच्या साहाय्याने हल्ला करून जबर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी-
आरोपी काळेंच्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या पथकाने पुळुज पारधी वस्तीवर छापा मारला. त्यावेळी आरोपी काळे हे बाबर मळ्याकडे जाणाऱ्या रोडवरून पळ काढू लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करुन त्या दोन्ही आरोपींना धारदार शस्त्रांसह ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या. या आरेापींवर पंढरपूर आणि कुर्डुवाडी पोलीस ठाण्यास देखील गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपीचा चार वर्षांपासून शोध सुरू होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गंभीर गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपी, दरोडेखोर आणि मोक्कामधील आरोपींना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण अवचर याच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.