सोलापूर- बार्शी येथील पारधी वस्तीमध्ये कोरोना देवीची पूजा करून कोरोनाविषयी खोटी अफवा पसरवणाऱ्या दोघांवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ परशुराम पवार ( वय ४२) आणि ताराबाई भगवंत पवार (वय ५२) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
बार्शी शहरात असलेल्या सोलापूर रोडवरील पारधी वस्तीत सदर आरोपींनी कोरोना देवी अस्तित्वात आहे, त्यासमोर बकरे, कोंबडी कापून पूजा केली तर कोरोना रोग होत नाही. तसेच, कोविड देवी आहे. या देवीला नैवेद्य दाखवले आणि मास्क सॅनिटायझर वापरले नाही तरी चालते, अशी खोटी अफवा पसरवली होती.
आम्ही एवढे दिवस या कोरोना देवीची पूजा करतो, आम्ही मास्क वापरले नाही, सॅनिटायझर वापरले नाही, आम्हाला कोणतेही आजार झाले नाही. तसेच, देवीची ओटी भरल्यास कोविड रुग्ण बरा होतो. अशी अफवा आरोपींनी केली. त्यामुळे, परिसरात कोरोनाबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन संसर्ग वाढण्याची भीती होती. याप्रकरणी कॉन्सटेबल रविकांत लगदिवे यांनी फिर्याद दाखल केली असून आरोपी सोमनाथ पवार व ताराबाई पवार (दोघेही रा. सोलापूर रोड बार्शी) यांच्यावर भा.द.वि च्या विविध कलमान्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक शेलार करत आहे.
ऐकावे ते नवलच
आरोपींनी घरासमोर एका छोटासा फरशीचा कट्टा बांधून कोरोना आई किंवा कोरोना देवी आहे, अशी अफवा पसरवली. कोरोना देवीला नैवेद्य लागते या अफवेला बळी पडून अनेकांनी बकरे, कोंबड्यांची बळी दिली. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स हे सर्व प्रकार काहीही नाहीत. कोरोना देवीला खुश केल्याने कोरोना आजार होत नाही, अशी अफवा जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. या सर्व घटनांचा अंनिसने विरोध केला आहे.
हेही वाचा- खासगी सावकारी करणारा गुन्हेगार तिसऱ्यांदा स्थानबद्ध