सोलापूर- तूफान आलया म्हणतं तृतीयपंथीयांनी हातात फावडं, टीकाव आणि कुदळ घेऊन श्रमदान केले. हे घडलं उत्तर सोलापूर तालूक्यातील वडाळा येथील पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाच्या कार्यात. उत्तर सोलापूर तालूक्यातील वडाळा ग्रामपंचायतीने सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. या श्रमदानात तृतीयपंथीयांनीही सहभाग दर्शवला.
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी व वडाळा गाव पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी व दुष्काळमुक्त बनविण्यासाठी वडाळा गावात पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाला गाव शिवारात सुरूवात झाली. श्रमदानाचे उद्घाटन गावच्या सरपंच छाया कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वडाळा गावातील दुष्काळ मुक्तीच्या या श्रमदानामध्ये तृतीयपंथीयांनी देखील श्रमदान केले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाला सुरूवात करण्यात आली आहे. या श्रमदानाला वडाळा गावातील लोकांनी उस्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला. गावातील लहान मूलासोबतच वयोवृद्धांनी देखील श्रमदान करत दुष्काळाशी दोन हात करून गावाला पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण बनविण्याचा निर्णय घेतला आहे.