सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करुन देणारी तुतारी ग्रामीण महाराष्ट्रात आजही स्फूर्तीस्रोत मानली जाते. म्हणून या कलेचा लोकाश्रय आजही कायम आहे. गावाकडे दिवाळीच्या सणानिमित्त आपली कला सादर करुन लोकमनोरंजनाची परंपरा जपणारे अनेक कलावंत आहेत. मोहोळ तालुक्यातील दादपूरचे तुतारीवादक तुकाराम ठोकडे त्यापैकीच एक आहेत.
ठोकडे यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी तुतारी वाजवायला सुरुवात केली. गेली चाळीस वर्षे ही लोकमनोरंजनांची कला ते अविरतपणे जपत आहेत. पंचक्रोशीत कुस्ती, निवडणूक, लग्न समारंभ, सण असा कोणताही सोहळा असला तरी या तुतारी वादकाला मानाचे निमंत्रण असते. त्यावरच ठोकळे यांचा उदरनिर्वाह चालतो.आता दिवाळीला ते गावोगावी फिरुन दिवाळसण मागतात. त्यांना वादनाच्या बदल्यात फराळ आणि रोख रक्कम मिळते. संगीत क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगती केली असली तरी, या नैसर्गिक आवाजाची जादू आजही कायम आहे. आता या पट्टीत कोणीच तुतारी वाजवत नाही. म्हणून, या अभिजात कलेला प्रेमाची दादही मिळते.