सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात नियमभंग करणाऱ्यांकडून सुमारे तीन कोटी रुपयांचा दंड वसून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तहसील, नगरपालिका, महापालिका आणि पोलिसांच्या एकूण कारवाईमध्ये हा दंड वसूल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, मास्क न वापरणे, दुचाकीवर मर्यादेपेक्षा अधिक लोकांनी प्रवास करणे, चारचाकी वाहनांचा विना परवाना वापर करणे, मर्यादेपेक्षा अधिक तसेच परवाना नसताना प्रवास करणे, निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवणे, सामाजिक आणि शारिरिक अंतर न पाळणे अशा प्रकारच्या घटनांमध्ये केलेल्या कारवाईत शहर आणि जिल्ह्यात मिळून जवळपास एक कोटी 65 लाख 94 हजार 470 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तसेच, 6 जुलै ते 15 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांनी 17,007 गुन्हे दाखल केले असून, यातून जवळपास 23 लाख 71 हजार 500 रुपंयाचा दंड वसूल केला आहे. तर सर्व नगरपालिका कार्यालयांकडे 5,063 गुन्हे दाखल झाले असून, यातून 68 लाख 6 हजार 330 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात विविध ठिकाणी जवळपास 88,637 जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 1 कोटी 20 लाख 24 हजार 650 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, महापालिका हद्दीत 7,150 जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून जवळपास 15 लाख 11 हजार 990 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा : घरच्यांच्या भीतीपोटी अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या; मोहोळमधील घटना