सोलापूर - सांगोला तालुक्यातील महुद येथील बंडगरवाडीजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकींचा अपघात झाला. ट्रॅक्टरने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. भगवान पडळकर (वय 70) , अक्षय पडळकर (वय 20 रा. कासेगाव ता. पंढरपूर), मुक्ताबाई कांबळे (वय 75 रा. देवापूर ता. माण जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत.
असा झाला अपघात -
दिघंचीहुन महूदकडे निघालेल्या भरधाव ट्रॅक्टरने बंडगरवाडी येथे दिघंचीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या दुचाकीवरील आजोबा व नातू जागीच ठार झाले. तर, याच ट्रॅक्टरने पुढे जाऊन दुसऱ्या दुचाकीला मागून धडक दिल्याने मुक्ताबाई कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला व दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी सांगोला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवदर्शनासाठी निघालेल्या आजोबा व नातवावर काळाचा घाला -
कासेगाव येथून आजोबा भगवान पडळकर व नातू अक्षय पडळकर हे देवदर्शनासाठी खरसुंडीकडे निघाले होते. रस्त्यात ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. देवापूर येथील मुक्ताबाई कांबळे कावीळ आजाराचे औषध आणण्यासाठी जात होत्या. या प्रकरणाचा पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.