सोलापूर - अक्कलकोटहून निघालेल्या कंटेनरने वळसंग येथे एका वडापावच्या गाडीला धडक दिली. तेथील नागरिक मागे लागल्यावर कंटेनर चालक बिथरला आणि त्याने कंटेनर थांबविण्याऐवजी सुसाट हाकला. यामध्ये त्याने वळसंग येथे दुचाकीवर असलेल्या दोघांना चिरडले तर कुंभारी येथे एकाला चिरडले. या अपघातात एकूण तीन ठार झाले आहेत. अपघातानंतर कुंभारी मधील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. या अपघातात सकलेन मोहमद कुरेशी (वय २० वर्ष,रा.वळसंग,सोलापूर),रोहित बाळू चौगुले (वय २३ वर्ष,रा.वळसंग,सोलापूर) या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
कुंभारी गावात दोघांना उडवले -
कंटेनर चालक वळसंग येथे दुचाकी स्वाराला उडवून सुसाट कुंभारी गावाजवळ शुक्रवारी रात्री १०च्या सुमारास आला. कुंभारी गावाजवळ गर्दी असल्याने रस्त्यावर नागरिकांची रेलचेल होती. आपल्याला पकडून मारतील या भीतीपोटी कंटेनर चालकाने सुसाट वाहन हाकत पळून जाण्याचा प्रयत्न केला. कुंभारी गावाजवळ त्याने सुभाष चाफेकर(वय 50,रा कुंभारी,सोलापूर)यास उडवले. सुभाष चाफेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांसोबत असलेला अमित सुभाष चाफेकर हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अक्कलकोट सोलापूर महामार्गावर ठिय्या -
अपघात झाल्यानंतर गावकऱ्यांनी अक्कलकोट सोलापूर महामार्गावर ठिय्या केला. कंटेनर चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पुण्यातील 'त्या' भीषण आपघाताची पुनरावृत्ती -
पुण्यात गेल्या काही वर्षापूर्वी एसटी चालक संतोष माने याने स्वारगेट बस स्थानकातून सुसाट बस हाकत ८ ते १० जणांना चिरडून ठार केले होते. त्याचीच पुनरावृत्ती सोलापूरमधील कुंभारी आणि वळसंग गावाच्या शिवारात झाली. या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. कंटेनरचालक पी.के.पांडेविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कंटेनर चालकास बेदम मारहाण; प्रकृती चिंताजनक -
कंटेनरचालक सुसाट कुंभारी गावातील वेशीत शिरला आणि अडकला. ग्रामस्थांनी कंटेनर चालक पांडे यास पकडून बेदम मारहाण केली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
हेही वाचा - गाबा कसोटी : पावसामुळे खेळ थांबला, रोहित-शुबमन माघारी