सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकातून परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारी दुसरी रेल्वे आज दुपारी अडीच वाजता लखनऊकडे रवाना झाली. विशेष रेल्वेमध्ये 1 हजार 632 मजूर पाठवण्यात आले आहेत. पाठविण्यात येत असलेल्या कामगारांची तपासणी करूनच त्यांना रेल्वेमध्ये बसविण्यात आले. सर्व मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे पैसे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेल्वे खात्याकडे जमा करण्यात आले आहेत.
लॉकडाऊनमुळे आणि जिल्ह्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशमधील 1 हजार 632 नागरिक आणि विद्यार्थ्यांना घेऊन विशेष रेल्वे लखनऊकडे रवाना झाली. जिल्हा प्रशासन, रेल्वे विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून यासाठीचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त बापू बांगर आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकार्यांनी हिरवा झेंडा दाखविला.
सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून या नागरिकांची नाव नोंदणी करून त्यांना रेल्वे स्थानकावर बोलविण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंग ठेवून प्रवासी नागरिकांची आवश्यक कागदपत्रे तपासणी, थर्मल स्क्रीनिंग करून त्यांना रेल्वे डब्यात बसविण्यात आले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात असणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मजूर, नागरिकांनी पायी न जाता तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केले आहे.
याआधी रविवारी सोलापूर रेल्वे स्थानकावरून 1 हजार 146 नागरिकांना घेऊन ग्वाल्हेरकडे रेल्वे रवाना झाली. आता झारखंड, बिहार आणि राजस्थानला रेल्वेद्वारे सोडण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी परवानगी मिळताच रेल्वे जाईल, अशी माहिती जाधव यांनी दिली.
'प्रिसिजन'कडून पंधराशे भोजन पाकिटचे वाटप -
सोलापुरातील प्रिसिजन उद्योग समूहाकडून आज उत्तर प्रदेशकडे निघालेल्या रेल्वेतील एकूण पंधराशे नागरिकांना भोजन पाकिटचे वाटप करण्यात आले. प्रिसिजन उद्योग समूहाचे प्रमुख यतीन शहा, डॉ. सुहासिनी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे आदित्य गाडगीळ यांनी भोजन पाकिटचे वाटप केले.