सोलापूर - घाटणे (ता. मोहोळ) येथे मार्चपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात पहिला रुग्ण आढळला आणि तेथून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून, गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र करत "बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' ही मोहीम जिल्ह्यातील सर्वांत तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी हाती घेतली. याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि बघता बघता गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली आणि आज गाव कोरोनामुक्त झाले आहे.
घाटणे ग्रामपंचायतीचा एक सेवक म्हणून तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी ही तळमळ आहे. आपले पूर्ण सहकार्य देऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन देशमुख यांनी ग्रामस्थांना केले होते. या आवाहनाला ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद आणि कोरोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसुत्रीच्या आधारावर देशमुख यांनी गाव कोरोनामुक्त करून दाखवले आहे.
पंचसुत्री मोहिमेतील उपाययोजना
गावातील जी मंडळी शहरात जातात किंवा लोकांच्या संपर्कातील विविध व्यवसायात असतात, त्यांच्या आवश्यकतेनुसार रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या .
गावातील 45 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेतले.
गावात घरोघरी जाऊन आशा सेविकेच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला गावकऱ्यांची तपासणी केली. त्यात त्यांची ऑक्सिजन पातळी, तापमान याची वेळोवेळी नोंद ठेवण्यात आली.
प्रत्येक कुटुंबाला एक "कोरोना सेफ्टी किट' देण्यात आले, या किटमध्ये व्हिटॅमिनच्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण यांचा समावेश होता.
बाहेर गावातून राहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना सक्तीने तीन दिवस क्वारंटाइन करून या माध्यमातून कोरोनाची चेन ब्रेक करण्याचा प्रयत्न केला.
करोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसुत्रीच्या आधारावर गाव कोरोनामुक्त केले.
हेही वाचा - 'गोपनीयतेचा अधिकार मुलभूत हक्क, पण राष्ट्रीय सुरक्षेचीही सरकारवर जबाबदारी'