पंढरपूर (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक 14 टक्के दरवाढ द्यावी, या मागणीसाठी तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी (दि. 18 डिसें.) तलवारी दाखवत आंदोलनकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न अज्ञताकडून झाला. त्यानंतर शनिवारी दिवसभर जिल्ह्यातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते कारखाना परिसरात दाखल झाले. आज (दि. 20 डिसें.) कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या घेत कारखाना बंद पाडाला. मागणी पूर्ण होईपर्यंत कारखाना सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
कारखान्यांनी एफआरपी जाहीर करावी
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मरवडे येथे ट्रॉली जाळण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला होता. तसाच प्रकार शेतकऱ्यांकडून बालाजीनगर येथेही झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक घेत त्या बैठकीत 15 डिसेंबरपर्यंत याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 16 डिसेंबरनंतर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात आंदोलन सुरू केले.
नेमके काय झाले शुक्रवारी..?
दत्तात्रय लक्ष्मण पाटील (रा. मरवडे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दामाजी साखर कारखान्याने या नियमाचे पालन केले नाही म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राहुल घुले, श्रीमंत केदार व राजेंद्र रणे यांच्यासह दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी (दि. 18 डिसें.) रात्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना चौकातून लाल रंगाच्या दुचाकीवर दोन अज्ञात व्यक्ती आले. यापैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने (अंदाजे वय 40 वर्षे) आंदोलकांकडे बघत तलवार दाखवत इशारा दिला व पळ काढला. आंदोलनस्थळी तैनात असलेल्या दोन होमगार्डने त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते निसटले.
हेही वाचा - बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांना कोणी दिली?, अनेक प्रश्न गुलदस्तात
हेही वाचा - मंगळवेढ्यातील स्वाभिमानीचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न, आंदोलकांना तलवारीचा धाक