सोलापूर - कोरोना या संसर्गजन्य आजाराचा बिमोड करण्यासाठी बार्शी येथील पारधी वस्तीतील घरांत व कोरोना देवीच्या मंदिराची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे या कोरोना देवीच्या मंदिरात कोंबडी व बकऱ्यांचे बळी देखील दिले जात आहेत. बार्शी शहरातील मुख्य रस्त्यावर पारधी वस्ती आहे. या ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक फोटोंसह देव्हारा असलेल्या देवघरात लिंबू ठेऊन स्थानिकांनी कोरोना देवीची स्थापना केली आहे. कोरोना महामारीमुळे कोरोना आईची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती वस्तीवरील नागरीक देत आहेत. राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन सुरू असताना, सोलापुरात कोरोना देवीचे मंदिर उघडण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी पारधी वस्तीतील व्यक्तींकडून ‘कोरोना’ नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे,मेंढरं आदींचा बळी देऊन त्याचे पूजन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बार्शी शहरातील पारधी वस्ती सध्या याच कोरोना देवीच्या मंदिरामुळे चर्चेत आली आहे. कोरोना महामारीमुळे कोरोना देवीची स्थापना करून त्याचे पूजन सुरू केले असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. देवीच्या सेवेने आमचे वाईट होणार नसल्याचाही त्यांचा विश्वास आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र बार्शीतील पारधी वस्तीत कोरोनाचा बिमोड करण्यासाठी कोरोना देवीची स्थापना करण्यात आलीय. विशेष म्हणजे या कोरोना देवीचा प्रभाव ही लोकांना जाणवू लागल्याचे स्थानिकांनी सांगितले.
कोरोना देवी देखील अजब आहे. नैवेद्याला कोंबडं आणि बकऱ्याचा बळी या देवीसाठी दिला जातोय. कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी मास्क सॅनिटायझर याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पण कोरोना देवीचे भक्त आमचा रोग जावा, सुख मिळावे म्हणून कोरोना देवीला बकरे, मेंढरं यांचा बळी देत कोरोना पासून सुरक्षेची प्रार्थना करत आहेत. कोरोना आईच्या कृपेमुळे तोंडाला मास्क लावायची गरज नसल्याचे वस्तीवरील नागरिकांनी सांगितले.
पारधी वस्तीमधील महिलांना ही अकल्पीत देवी मोठा आधार वाटू लागली आहे. आम्ही कोरोनादेवीची स्थापना केली. आम्ही तिला मरेपर्यंत मानणार, असे त्या म्हणत आहेत. आखाडाच्या महिन्यापासून त्यांनी या देवाच स्थापना केल्याचं सांगितले. यापुढेही आयुष्यभर कोरोना देवीची पूजा करणार व देवीपासून आमचे चांगले होईल, अशी आशा या महिला व्यक्त करत आहेत.
कोरोना वर एकमेव उपाय म्हणजे लस: अंधश्रद्धा निर्मूलन समिती
कोरोनावर लस हाच एकमेव उपाय असल्याचे अंनिसने सांगितले. हा सर्व भावनेचा बाजार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गोष्टीचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी केली आहे. संविधान आपल्याला श्रद्धा ठेवण्याची आणि उपासना करण्याचा अधिकार देते. मात्र त्या नावावर अंधश्रद्धा जोपासत असल्यास आणि त्यामार्फत शोषणाला बळी पडत असल्यास या वृत्तीचा विरोध करणे आवश्यक असल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.