सोलापूर- वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी पूर्व परीक्षा (नीट) दिलेल्या विद्यार्थिनीला केंद्रीय शिक्षण विभागाने सुरुवातीला पास म्हणून रिझल्ट दिला होता. त्यानंतर अॅडमिशन घेण्यासाठी गेल्यावर तिचा निकाल हा अचानकपणे नापास असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निकलातील या गोंधळामुळे या विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार आहे. तसेच परीक्षा पास होऊन वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार नसल्याने ती विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली गेली आहे. ऐश्वर्या पवार असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
प्रवेशावेळी ऑनलाईन निकालपत्रावर ४१ मार्कांचा उल्लेख-
ऐश्वर्या पवार या विद्यार्थिनी वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १३ सप्टेबरला दिली होती. १६ ऑक्टोबरला लागलेल्या या परीक्षेच्या निकालामध्ये तिला सुरुवातीला 276 मार्क प्राप्त झाल्याने या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. मात्र, ऐश्वर्या ज्यावेळी अॅडमिशन घेण्यासाठी गेली असता, ऑनलाईन रिझल्टमध्ये तिला केवळ 41 मार्क पडल्याचे दिसून आले. एकीकडे 276 मार्क पडल्याचा रिझल्ट प्राप्त होतो आणि दुसरीकडे फक्त 41 मार्क असल्याचा रिझल्ट ऑनलाईन दर्शवत असल्याने तिच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्रीय पात्रता परीक्षा घेणाऱ्या विभागाचा भोंगळ कारभार या प्रकरणातून समोर आला आहे.