सोलापूर - स्वस्तात औषधे खरेदी करून देतो, अशी थाप मारून एका ग्रामस्थास लुटणाऱ्या भामट्याला सदर बझार पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक केले आहे. करणसिंग राजपूत (रा. आशा नगर, सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वसंत भगवंत मोटे (52 रा. नरखेड, ता .मोहोळ, जि. सोलापूर) यांनी आपल्या मुलाला रुग्णालयात दाखल केले. गेल्या दोन महिन्यांपासून वसंत मोटे यांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. मुलाच्या उपचारासाठी त्यांनी आपली शेती विकली होती. दिनांक 9 ऑगस्ट रोजी मुलाच्या उपचारासाठी डॉक्टरांनी औषधे लिहून दिली आणि औषधे लवकर आणायला सांगितले होते. सकाळच्या सुमारास वसंत मोटे हे सात रस्ता येथील एका मेडिकलमध्ये औषधे आणायला जात असताना एक भामटा तिथे पाळत ठेवून होता.
हेही वाचा - स्वत:च्याच रायफलने गोळी मारुन घेत भारतीय जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न
त्याने वसंत मोटे यांना तुम्हाला स्वस्तात औषधे आणून देतो अशी थाप मारून स्वतः च्या दुचाकीवर घेऊन निघाला. एका निर्जन ठिकाणी दुचाकी वाहन थांबवून खिशातील 18 हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली आणि दमदाटी करून गालावर चापट मारून निघून गेला. मुलाच्या औषधासाठी असलेली रक्कम चोरट्याने लंपास केली. याचे दुःख सहन न होता वसंत मोटे हे जागेवरच रडत बसले होते.
त्या निर्जन ठिकाणाहून कसे तरी चालत त्यांनी रुग्णालय गाठले. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सदर बझार पोलीस स्टेशन गाठले आणि हकीकत सांगितली. एका शेतकाऱ्याची रक्कम अशी पळवली, पोलिसांना देखील त्या शेतकऱ्यावर दया आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुप्तचरांमार्फत माहिती मिळवली.
त्यानंतर काही तासातच करणसिंग राजपूत याला अटक करून कारवाई केली. पोलिसांनी त्या संशयित भमट्याकडून रक्कम काढून त्या शेतकऱ्याला दिली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे आदींनी केली.